Saturday, 14 March 2020

एकांताचं स्वगत

तसा प्रमोद दादाला मी बऱ्याच दिवसांपासून ओळखतो . पनवेल येथील जेष्ठ गजलकार आणि आमचे गुरू श्री ए के शेख याच्या कडून बऱ्याच वेळा मी प्रमोद दादांचं नाव ऐकलं होतं . पनवेल ला एका कार्यक्रमाला प्रमोद दादा आला होता तेव्हा पहिल्यांदा आमची भेट झाली होती.तेव्हा काही  मोजकच बोलणं झालं होतं,नंतर हळू हळू संपर्क वाढला पण प्रमोद दादा मला खरा  कळायला लागला तो  त्याच्या पुस्तकातून तेव्हा त्याचा नुकताच 'समतोल 'हा गजल संग्रह प्रकाशीत झाला होता. तो जसा आहे ,तो जसा वागतो, तो जसा बोलतो, तो जसा राहतो, अगदी तसंच  त्याच लिखाण आहे. एकदम अलवार ,हळुवार काळजाला स्पर्श करणारं एकदम हळव्या मनाचा संवेदनशील असा हा प्रमोद आहे.हा आणि एक गोष्ट प्रमोद दादा बद्दल  तो खूप प्रामाणिक आहे. त्याच्या लेखनिशी कोणताही खोटे पणा त्याच्या लिखाणात नाही कोणताही फुकटचा बनाव त्याच्या लिखाणात नाही  . त्याने जे सोसलं आहे त्याने जे भोगलं ते तसच्या तसं त्याने आपल्या कवितेत आणि गजलेत उतरवलं आहे.  
      आता मागच्याच महिन्यात ९ फेब्रुवारीला प्रमोद दादाच्या  'एकांताचं 
स्वगत' या पुस्तकाचं  प्रकाशन झालं. खूप सुंदर झाला होता सोहळा.मला घरी परततांना पण  बराच उशीर झाला होता आणि दुसऱ्या दिवशी पण कामाची खूप गडबड होती बघता बघता आठवडा असाच गेला पण पुस्तकाचे  काही  वाचन झालं नाही. 
         मग रविवार आला माझी बाकी सगळी उरली सुरलेली कामे करण्यात दिवस निघून गेला. आणि रात्री काही ११.३० सुमारास मी प्रमोद दादाचं एकांताचं स्वगत हे पुस्तक वाचायला घेतलं. आणि सकाळी ४.३० की ५ पर्यत मी ते पुस्तक वाचतच राहिलो. पुन्हा जरा वेळ झोपलो आणि पुन्हा ते पुस्तक वाचायला घेतलं.. काल रात्री वाचलं तरी मनच भरलं नव्हत माझं.  पुस्तक वाचताना प्रमोद दादाने मांडलेला एक एक प्रसंग जणू जिवंत होत होता डोळ्या समोर.. कितीतरी जुन्या जखाम पुन्हा नव्याने जाग्या झाल्या. किती तरी घाव पुन्हा नव्याने ओले झाले.. प्रमोद दादाने खूप हसवल खूप रडवल. वेड केलं.
        व पु काळे यांचं पुस्तक वाचताना कसा आपल्या अंगावर काटा येतो ,जीवाला चटका लागून जातो तसच काही प्रमोद दादाच एकांताचं स्वगत हे पुस्तक वाचताना होतं. एक एक कविता ही मनाला चटका लावून जाते खूप , किती साध्या सरळ आणि  सोप्या शब्दात प्रमोद दादा खूप काही बोलून जातो. एखादा परीस कसा असतो त्याला कसला स्पर्श झाला की त्याच तो सोन करून टाकतो अगदी तसच प्रमोद दादा जे काही लिहतो त्याच सोन करून टाकतो.
           मनात अजून खूप काही साचलं आहे. हे सांगावं व की नेमकं ते सांगावं मला कळत नाहीये. एक नक्की सांगतो मी प्रत्येकाच्या संग्रही असाव असं हे पुस्तक आहे. तर मित्रांनो हे पुस्तक विकत घ्या आणि आपल्या  प्रेमाच्या माणसांना नक्की हे पुस्तक भेट द्या..  आयुष्यातली सगळ्यात सुंदर अशी भेट असेल ती त्यांच्यासाठी......
           आणि प्रमोद दादाला पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा...     सतिष अहिरे