Friday, 21 January 2022

माधव ज्युलियन

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन यांचा जन्म २१ जानेवारी १८९४ रोजी आजोळी बडोदा, येथे झाला होता आणि मृत्यू -२९ नोव्हेंबर १९३९ पुण्यामध्ये त्याच्या राहत्या घरी झाला होता. त्यांचं पाळण्यातले नाव 'गजानन' असं होत पण लहान पणी दोन महिन्यांचे असताना ते अखंड रडू लागले म्हणून त्यांच्या आत्या बाईनी त्यांची जोड्याने तुळा केली व घराण्याचा मूळ पुरुष ' महादेव ' हे जुनाट नाव त्यांना ठेवलं. मोठेपणी कॉलेजात गेल्यावर त्यांना ते नाव अवडेनासे झाले आणि १९१२ पासून त्यांनी स्वतःचे नाव बदलून 'माधव ' असे ठेवले आणि तेच नाव पुढे रूढ झाले .
   
    त्यांनी इ.स. १९१६ साली फारसी भाषा हा विशेष विषय निवडून बी.ए. पदवी मिळवली, तर इ.स. १९१८ साली इंग्रजी साहित्य हा विषय निवडून एम.ए.चा पदव्युत्तर अभ्यासक्रम पुरा केला होता.

माधव जूलियन हे मराठी भाषेतील कवी, रविकिरण मंडळाचे संस्थापक व सर्वांत यशस्वी सदस्य होते. ते फारसी आणि इंग्रजीचे प्राध्यापक होते. माधव जूलियन हे मुंबई विद्यापीठाच्या मराठी साहित्यातील पहिल्या डी.लिट. पदवीचे मानकरी आहेत. इंग्लिश कवी शेले याने रचलेल्या ज्यूलियन आणि मडालो या कवितेवरून यांनी "जूलियन" असे टोपणनाव धारण केले .
पण माधव त्र्यंबक पटवर्धनांचे जूलियन नावाच्या मुलीवर प्रेम होते. तिच्याशी प्रेमभंग झाल्यानंतर तिची आठवण म्हणून त्यांनी माधव जूलियन हे टोपण नाव घेतले हीच माहिती लोकप्रसिद्ध आहे याशिवाय ’गॉड्ज गुड मेन’ या कादंबरीतील नायिका ’ज्युलियन’ या व्यक्तिरेखेवरून माधवरावांनी ज्युलियन हे नाव उचलले असेही सांगितले जाते.

गजल व रुबाई हे काव्यप्रकार फारसीतून मराठीत प्रथम आणण्याचे श्रेय माधव जूलियन यांना देण्यात येते. माधव ज्युलियनांनी दित्जू, मा.जू. आणि एम्‌. जूलियन या नावांनीही लिखाण केले आहे. त्यांनी कविवर्य भा.रा. तांबे यांच्या कवितांचे संकलन आणि संपादन केले आहे. उत्कृष्ट संपादनाचा हा एक नमुना मानला जातो. तसेच त्यांचे काही लिखाण इंग्रजीतही आहे.

माधव जूलियन यांनी कवितांशिवाय भाषाशास्त्रीय लेखनही केले. सोप्या व शुद्ध मराठी लेखनाचे पुरस्कारणाऱ्या पटवर्धनांनी भाषाशुद्धि-विवेक हा ग्रंथ लिहिला. ह्या ग्रंथात कालबाह्य ठरलेल्या शेकडो मराठी शब्दांची सूची समाविष्ट आहे.

 माधव जूलियन कार्यमग्न असताना आणि यशाच्या शिखरावर असताना अचानक पणे गेले त्यांना लिव्हर कॅन्सर झाला होता पुण्याच्या स्वतःच्या राहत्या घरी २९ नोव्हेंबर १९३९ च्या रात्री त्यांची प्राणज्योत मालवली त्यावेळी ते केवळ ४६ वर्षाचे होते.

माधव जूलियन यांच्या पत्नी लीलाताई पटवर्धन यांनी आमची अकरा वर्षे (१९४५) या पुस्तकात माधवरावांच्या आठवणी सांगितल्या आहेत.
माधवरावांचे व्यक्तिमत्त्व वादळी ठरले होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्यावर तीन-चार चरित्रग्रंथ लिहिले गेले आहेत.
स्वप्नभूमी माधव ज्यूलियन : लेखक शंकर केशव कानेटकर
डॉ. पटवर्धन ऊर्फ माधव ज्यूलियन : लेखक दत्तात्रेय नरसिंह गोखले
माधव ज्यूलियन : गंगाधर देवराम खानोलकर

माधव ज्यलियन यांची ग्रंथ संपदा पुढील प्रमाणे आहे.
उमरखय्यामच्या रुबाया (इ.स. १९२९, मूळ पर्शियन रुबायांचा पहिला अनुवाद)
काव्यचिकित्सा (निधनोत्तर इ.स. १९६४, लेखसंग्रह)
काव्यविहार (निधनोत्तर इ.स. १९४७, लेखसंग्रह)
गज्जलांजली(१९३३, स्फुट गझला)
छंदोरचना (१९३७, संशोधनात्मक)
तुटलेले दिवे (१९३८, एक 'सुनितांची माला'नामक दीर्घकाव्य आणि बाकीच्या स्फुट कविता)
द्राक्षकन्या (इ.स. १९३१, रुबायांचे दुसरे मराठी भाषांतर)
नकुलालङ्कार (इ.स. १९२९, दीर्घकाव्य)
फारसी - मराठी शब्दकोष (इ.स. १९२५)
भाषाशुद्धि-विवेक (१९३८, लेख आणि भाषणे)
मधुलहरी (मृत्यूनंतर इ.स. १९४०, रुबायांचे सुधारित तिसरे भाषांतर)
विरहतरङ्ग (इ.स. १९२६, खंडकाव्य)
सुधारक (१९२८, दीर्घकाव्य)
स्वप्नरंजन (१९३४, काव्यसंग्रह)

ते इ.स. १९३३मध्ये नाशिक येथे झालेल्या कविसंमेलनाचे अध्यक्ष होते तसेच इ.स. १९३४मध्ये बडोदे येथे झालेल्या साहित्यसंमेलनात ते कविशाखेचे अध्यक्ष होते.
 इ.स. १९३६मध्ये जळगाव येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलन.अध्यक्ष होते 
पुण्यातल्या टिळकरोडवरील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहाला ’माधवराव पटवर्धन सभागृह’ असे नाव देण्यात आले आहे.
       माधव ज्युलियन यांना केवळ ४६ वर्षाचं आयुष लाभलं त्यातील सुरुवातीचे २४ वर्ष शैक्षणिक काळ यातून वजा करता फक्त २२ वर्ष त्यांच्या साहित्य कर्तुत्वाचे म्हणता येतील. या अल्प काळात त्यांनी केलेली साहित्य निर्मिती ही विपुल व वैविध्यपूर्ण आहे.
    माधव ज्युलियन यांचं काव्य कर्तुत्व फार मोठा आहे. त्यांचे इतर बरेचसे गद्यलेखनही काव्य लेखनाशी संबंधित आहे.
     त्यांचे सर्व जीवन हे त्यांच्या काव्यात व्यक्त झालेले आहेत. त्यांच्या कवितेला कोणाची ही परंपरा नाही , ती स्वतंत्र आहे. तिच्यावर इंग्रजी ,फारसी ,संस्कृत ,गुजराती या भाषेचेही संस्कार आहेत पण त्या भाषेतील काव्याचे अनुकरण नाही. प्रत्येक काव्यात आशय आणि अभिव्यक्ती या पूर्णपणे वेगळ्या आहेत.
     माधव ज्युलियन यांच्या साहित्यात विविधता आहे त्यांनी स्फुट काव्य लिहिली, दीर्घकाव्य लिहिली ,अनेक लेख लिहिले, फारसी मराठी शब्दकोश तयार केला, छंदोरचना हा काव्याची माहिती आणि त्या संबधित वृत्ते आणि त्यांची उदाहरणे याप्रकारे आपल्या माहितीपूर्ण ग्रंथ लिहून मराठी साहित्याचे दालन समृद्ध केले.
   आम्ही आज देखील त्यांनी दाखवलेल्या वाटेवर चालत आहोत. गजल शिकत आहोत लिहत आहोत. मराठी साहित्यात गजल हा प्रकार त्यांनी आणला म्हणून आम्ही त्यांचे खूप ऋणी आहोत... त्यांच्या कर्तुत्वाला लाख लाख सलाम..  
   आज त्यांची एक कविता आणि तिचं रसग्रहण आपल्या समोर देत आहे .

मराठी असे आमुची मायबोली,
जरी आज ही राजभाषा नसे
नसो आज ऐश्वर्य या माऊलीला
यशाची पुढे दिव्य आशा असे

मराठी असे आमची मायबोली या कवितेत माधव ज्युलियन याची मराठी विषयीची तळमळ आपल्याला दिसून येते. कवितेतील पहिल्या कडव्यात ते बोलून जातात की मराठी जरी राज भाषा नाही तरी ती आमची माय बोली आहे. आज तिला ते ऐश्वर्य प्राप्त झालेला नाही ते महत्त्व प्राप्त झालेले नाही , तरी मला पूर्णपणे अशी आशा आहे की एक दिवस तिला तिचं महत्त्व तिचं ऐश्वर्य प्राप्त होईल. 
   

जरी पंचखंडातही मान्यता घे
स्वसत्ताबळें श्रीमती इंग्रजी
मराठी भिकारीण झाली तरीही
कुशीचा तिच्या, तीस केवीं त्यजी

या कडव्यात माधव ज्युलियन सांगताय की आज जरी सात खंड आहेत पूर्वी केवळ पाच खंड होती . आणि त्या काळातही इंग्रजीचं वर्चस्व पाचही खंडांमध्ये होतं इंग्रजी भाषाही त्यावेळी श्रीमंतीच्या शिखरावर होती. इंग्रजी भाषेच्या तुलनेत मराठी भाषेला तेवढं महत्त्व राहिलं नव्हतं म्हणून कवी ही कळकळीची विनंती करताहेत की आपल्या मायबोलीला असे त्यागु नका. 

जरी मान्यता आज हिंदीस देई
उदेलें नवें राष्ट्र हे हिंदवी
मनाचे मराठे मराठीस ध्याती
हिची जाणुनी योग्यता थोरवी
मराठी असे आमुची मायबोली,
जरी भिन्नधर्मानुयायी असूं,
पुरी बाणली बंधुता अंतरंगी,
हिच्या एक ताटात आम्ही बसूं!

या कडव्यात माधव ज्युलियन यांना असे बोलायचे आहे की जरी आज हिंदी भाषेला देशभर मान्यता प्राप्त झाली असेल. हे जरी नवे हिंदवी राज्य तयार झाले असेल तरीपण जे मनापासून मराठी आहे त्यांच्या मनात आपली मायबोली मराठीही वसते ते जरी भिन्न भिन्न जातीची धर्माचे असो वा पंतांचे असो तरीही आपल्या मायबोली बद्दल त्यांच्या मनात आस्था आहे. आणि आपल्या माय मराठी साठी आम्ही बंधुभाव हृदयात बसवला आहे आणि आपल्या मायबोलीसाठी आ आपापसातले मतभेद विसरून सर्व एकत्र आलेलो आहोत. 

हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडूं,
वसे आमुच्या मात्र हृन्मंदिरी,
जगन्मान्यता हीस अर्पूं प्रतापे,
हिला बैसवूं वैभवाच्या शिरीं!

या कडव्यात माधव ज्युलियन यांना असं बोलायचं आहे की आम्ही या माय मराठीचे पुत्र आहोत तिचे पांग आम्ही नक्कीच फेडू आमच्या हृदय मंदिरात फक्त माय मराठीच वसते आम्ही सगळे मिळून तिला या जगात मान्यता मिळवून देऊ तिला वैभवाच्या शिखरावर नेऊन बसवू. 


मराठी असे आमुची मायबोली
अहो पारतंत्र्यात ही खंगली
हिची थोर संपत्ती गेली
उपेक्षेमुळे खोल कालार्णवाच्या तळीं

या कडव्यात माधव ज्युलियन असं बोलायचं आहे की मराठी ही आपली थोर मायबोली आहे पण पारतंत्र्यात ही खूप खंगली गेली आहे दुर्लक्षित झाली आहे. आपल्या मायबोलीकच्या संपत्तीचा लोकांना आता विसर पडला आहे काळाच्या ओघात आपल्या माय मराठी ची संपत्ती ही एकदम तळाला जाऊन पोचलेली आहे.

तरी सिंधु मंथूनि काढूनि रत्नें
नियोजूं तयांना हिच्या मंडणी
नको रीण, देवोत देतील तेव्हा
जगांतील भाषा हिला खंडणी

या कडव्यात माधव जूलियन यांना असे बोलायचे आहे की आपल्या माय मराठीच्या साहित्य साठा हा सागरासारखा अखंड आहे विराट आहे त्यांच्या आम्ही सगळे मिळून मंथन करू आणि त्यातून जी साहित्यातली उत्कृष्ट अशी रत्ने आहेत त्यांना एक एक करून बाहेर काढू त्यांना जगाच्या समोर घेऊन जाऊ आमची साहित्य समृद्धी एवढी अफाट आहे अखंड आहे की तिला दुसऱ्या कोणत्याही भाषेचं ऋण घेण्याची गरज नाही उलट जगातील बाकी भाषा या आपल्या माय मराठीचे देणे लागतात. 

          तूर्तास इथेच थांबतो धन्यवाद 
           
              ( सतिष अहिरे ) 

13 comments: